माजलगाव : शेतात काम करणाऱ्या पाच मजुरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना बुधवारी दुपारी दुगड पेट्रोल पंपाच्या समोरील शेतामध्ये घडली. या रुग्णांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठेही रेबिजचे इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. शहरातील दीपक संकलेचा यांच्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे शेतमजूर प्रकाश थोरात व अन्य मजूर काम करत होते. अचानक शेतामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने प्रकाश थोरात यांच्यासह ५ मजुरांना चावा घेतला. हे पाचही मजूर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे रेबिजचे इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील किट्टी आडगाव, टाकरवण, पात्रुड, सादोळा, गंगामसला, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही चौकशी केली असता तेथेही रेबिज इंजेक्शनचा तुटवडा आढळून आला. त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबिज इंजेक्शन उपलब्ध करावीत, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांतून होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा माजलगावात पाच जणांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:31 AM