बीड : आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. हा निकाल दुसरे सत्र न्या. ए.एस.गांधी यांनी दिला.
सचिन विठ्ठल सुर्यवंशी (३२ रा.केरूळ ता.आष्टी), सय्यद गौस सय्यद नूर (२८, रा.अहमदनगर), भाऊसाहेब मोहन साबळे (३६ रा.केरूळ ता.आष्टी), महेंद्र सेवकराम महाजन (२८ रा.केरूळ ता.आष्टी) व नितीन संजय शिंदे (३० रा.जेऊर ता.अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. बाळू खाकाळ यांचा आणि सचीन सुर्यवंशी यांचा राजकीय वाद होता. याच वादातून ११ आॅक्टोबर २०११ रोजी खाकाळवाडी येथील यात्रेत बाळू खाकाळ यांच्यावर तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. खाकाळ यांच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल २९ वार केले होते. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे तथा अतिरिक्त सत्र न्या. ए.एस. गांधी यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. यामध्ये पाच जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. पाच जणांचे आलेले १ लाख रूपये हे मयत खाकाळ यांच्या पत्नीला द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.