अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरात शुक्रवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रितरित्या झालेल्या रिंगण सोहळ्याचा आनंद पावसाच्या सरींनी द्विगुणित केला. वेगवान अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘अश्व धावले रिंगणी, अन् तुका झाला आकाशाएवढा’ अशी अनुभती अंबाजोगाईकरांनी अनुभवली.आषाढी एकादशीनिमित्त अंबाजोगाईमार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या या दिंड्यांतील वारकरी मागील सात वर्षांपासून येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात. शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, गंगाखेड येथील संत जनाबाई, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा बाबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महमंद खान महाराज यांची पालखी तर अकोला येथील भाऊसागर माऊली यांची पालखी शहरात दाखल झाली.
या दिंडयांना टाळ-मृंदगासह विठ्ठलनामाच्या गजरात योगेश्वरी मैदान येथे बँड पथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणण्यात आले. यावेळी ध्वजारोहण, पालखी पूजन व अश्वपूजा करण्यात आली. यानंतर मनोहरी रिंगण सोहळा पार पडला. यावेळी रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अध्यक्ष दिलीप सांगळे, कार्याध्यक्ष बाबा महाराज जवळगावकर, उपाध्यक्ष दिलीप गित्ते, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, पंचायत समितीच्या सभापती मीना भताने, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, पं. उद्धवराव आपेगावकर, वैजनाथ देशमुख, बळीराम चोपने, अनंत आरसुडे, अभिजित जोंधळे, सुधाकर महाराज शिंदे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, मारूतीराव रेड्डी, बाळा पाथरकर, मुन्ना सोमाणी, योगेश कडबाने, दिग्विजय लोमटे यांनी पालखी प्रमुखांचे स्वागत केले.
अश्व रिंगण सोहळ्यानिमित्त वारकºयांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. रिंगण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते. त्यामुळे भविकांना रिंगण सोहळ्यात आनंदाने सहभागी होता आले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी शहर व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.