धारूर : गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या भरारी पथकाने बुधवारी (दि. १४) धारूर तालुक्यातील अनेक गावांतील शाळांना अचानक भेटी दिल्या असता पाच गावांतील शाळाच उघडल्या नसल्याचे दिसून आले; तर काही शाळांवर शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी सांगितले.
दि. १५ जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे; तर जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू हाेताच शिक्षकांना शाळेवर हजर राहून पूरक शैक्षणिक कामे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
शाळा चालू आहेत का? जर चालू असतील तर तेथील शिक्षक हजर आहेत का? ते कोणते कामकाज करीत आहेत याची तपासणी करण्यासाठी १४ जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडिल यांच्या भरारी पथकाने तालुक्यातील फकीर जवळा, चिखली, मुंगी, खामगाव, सुकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना अचानक भेटी दिल्या. या सर्व शाळा बंद असल्याचे पथकाला आढळून आले. यावेळी संबंधितांनी गावातील ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थितीत बंद शाळांचा पंचनामा करून संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
यानंतर पथकाने देवठाणा, देवदहिफळ, खंडोबा वस्ती, नागझरी तांडा, आदी ठिकाणच्या शाळांना भेटी दिल्या असता देवठाणा शाळेतील मुख्याध्यापक हे रजा मंजूर नसताना गैरहजर होते. तर नागझरी व खंडोबा वस्ती येथील शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले. देवदहिफळ येथील शाळेवर सर्व शिक्षक हजर होते. शिवाय तेथे बाला उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले.
कारवाईकडे लक्ष
शिक्षकांनी तब्बल १६ महिन्यांची सुट्टी घालविल्यानंतर आता शाळा चालू झाल्यापासून शाळेवर १०० टक्के उपस्थित राहून, शाळा पूर्वतयारीसह बाला उपक्रमाची अंमलबजावणी करणे गरजेचे असताना काही गावांमध्ये शिक्षक गैरहजर राहत असल्याने शिक्षणप्रेमी नागरिकांत संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या दांडीबहाद्दर शिक्षकांवर शिक्षण विभाग काय कारवाई करतो, याकडे शिक्षणप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
150721\15bed_13_15072021_14.jpg