बीड: शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना जोरदार धक्का दिला आहे. क्षीरसागर काका पुतण्या यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कुरघोड्या सुरूच आहेत. बीडमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा झटका दिला आहे.
राष्ट्रवादीचे पाच शिलेदार शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. संध्याकाळी ६ वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमात गंगाधर घुमरे, फारूक पटेल, नितीन लोढा, अमर नाईकवाडे आणि बाबुशेठ लोढा शिवसेनेत प्रवेश करतील. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत काम करत असताना होणारी घुसमट लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
संदीप क्षीरसागर आमदार झाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्याजवळचे अनेक जण दुरावले. आज शिवसेनेत प्रवेश करणारे पाचही जण आमदार क्षीरसागरांचे खंदे आणि कट्टर समर्थक मानले जातात. कट्टर समर्थक साथ सोडत असल्यानं संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसणार आहे. या पाच जणांसह इतरांनी संदीप क्षीरसागरांची साथ सोडल्यास राष्ट्रवादीची शहरातील ताकद कमी होणार आहे. या पाचही जणांनी संदीप क्षीरसागरांबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली होती.