आष्टी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात यावर्षी आगळीवेगळी शिवजयंती साजरी होत आहे. या निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मध्यभागी १०१ फूट उंच शिवस्तंभाची उभारणी करण्यात येणार आहे. तर १२ × २४ चौरस मीटर जागेमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात येणार आहे.
सालाबादाप्रमाणे आष्टी शहरात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या वर्षी उत्साहात मात्र कोरोनाच्या नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केले आहे. शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या १०१ फूट उंचीच्या शिवस्तंभाचे ध्वजारोहण सकाळी १०:१५ वाजता आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे. याच दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच आरती नवनाथ ससाणे नामक विद्यार्थीनी अश्वारुढ शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी तब्बल ३०० किलो रांगोळीतून साकारणार आहे. शहरवासियांसाठी आकर्षक देखावा असणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शहरातील प्रत्येक घराघरात बुंदीच्या महाप्रसादाचे वाटप शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.