लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाण्याच्या शोधार्थ राजस्थानहून पैठणकडे निघालेला ‘फ्लेमिंगो’ (रोहित) पक्षी पाटोदा तालुक्यातील डोमरी तलावावर आढळले आहेत. सुर्याेदयावेळी बीडमधील पक्षीमित्र जगदीश करपे यांनी त्यांचे छायाचित्रही टिपले आहेत. डोमरीच्या तलावावर आश्रय घेतल्यानंतर हे पक्षी पैठणच्या दिशेने गेल्याचे करपे यांनी सांगितले. अनेक दिवसानंतर फ्लेमिंगोचा थवा बीड जिल्ह्यात आढळल्याचा दावाही पक्षीमित्रांनी केला आहे.जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडामध्ये, तर दोन प्रजाती जुन्या जगात आढळतात.पाटोदा तालुक्यातील डोमरी धरणावर या पक्षांचे रविवारी पहाटे दर्शन झाले. पक्षीमित्र जगदिश करपे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या पक्षांचे थवे टिपले आहेत. या तलावावर त्यांची संख्या ३० ते ४० एवढी होती.या पक्षाचे मुळ निवास आफ्रिका, अमेरिका, युरोप आहे. सैबेरियातून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून गुजरात, राजस्थानच्या कच्छ भागात प्रथम हे पक्षी दाखल होतात. तेथून भारताच्या निरनिराळ्या भागांमध्ये स्थलांतरित होतात. एका रात्रीत ३७० मैल अंतर हा पक्षी कापू शकतो असे करपे यांनी सांगितले.
राजस्थानातून आलेला ‘फ्लेमिंगो’ डोमरी तलावावर विसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:11 AM