शिवसेनेची आरोग्य संचालकांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आरोग्य सेवक भरतीसाठी लागणारे फवारणी कर्मचाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्याचे बीड येथील जिल्हा हिवताप कार्यालयात रॅकेट कार्यरत आहे, या रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे बीड उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी पुणे येथील आरोग्य सहसंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात कंत्राटी फवारणी कर्मचाऱ्यांची भरती २००६ पासून पूर्णपणे बंद आहे. असे असताना बीड येथील कर्मचारी जीवन सानप व सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी आंधळे यांनी लाखो रुपये घेऊन बोगस अनुभव प्रमाणपत्र वाटली आहेत. वास्तविक हे प्रमाणपत्र देताना त्यांचे बोगस रेकॉर्ड बनवून करोडो रुपयांची माया कामावली आहे. या प्रमाणपत्राचा बीड येथील जिल्हा हिवताप कार्यालयात महापूर आला असून भरती बंद असताना सुमारे दोन हजार प्रमाणपत्रे वाटली गेली आहेत. यासाठी राज्यातील बेरोजगारांकडून प्रत्येकी बारा ते चौदा लाख रुपयांना गंडवले आहे. यात काही वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत. या प्रकाराची चौकशी करावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी पुणे येथील आरोग्य भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा लटपटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.