संडे स्टोरी
आष्टी तालुक्यातील हिवरा येथील युवक शेतकरी युवराज विजय लगड यांनी आपल्या खडकाळ जमिनीवर सव्वाएकरात शेवंतीचा मळा फुलविला आहे. त्यांची डोंगराच्या कडेला शेती आहे. त्यांनी उन्हाळ्यात पांढऱ्या शेवंतीच्या रोपांची लागवड केली. तिला टँकरने पाणी एका छोट्या खड्ड्यात टाकले. त्यावर पेप्सीची ठिबक अंथरून पाणी दिले. पावसाने ही शेवंती सध्या चांगली फुलली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे शेवंतीच्या फुलांंना चांगली मागणी आहे. सध्या ४० ते ६० किलो शेवंतीला भाव मिळत आहे. यंदा शेवंतीपासून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. युवकांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने व बाजारपेठेचा आढावा घेऊन शेती केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. असा सल्ला युवराज लगड यांनी दिला आहे. यासाठी प्रगतशील शेतकरी सागर लगड, गणेश लगड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पुढील वर्षी रंगीबेरंगी शेवंती फुलांचे उत्पन्न काढण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.