लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाची चेन ‘ब्रेक’ करण्यावर जास्त भर दिला जात आहे. यातच जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देऊन प्रतिकारशक्ती तयार करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग व प्रशासन करीत आहे; परंतु मागील काही दिवसांपासून केलेल्या ‘ब्रेक द चेन’चा विपरीत परिणाम लसीकरणावर होत आहे. मागील काही दिवसांपासून लसीकरणाच्या आकडेवारीत चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी कोरोनापासून आपला आणि कुटुंबाचा बचाव व्हावा, यासाठी ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांनी गैरसमज न ठेवता लस घेण्याची गरज आहे. यासाठी आराेग्य विभागाकडून वारंवार आवाहनही केले जात आहे.
लसीकरणाला जाताना पोलिसांनी अडविले तर?
कोरोना लसीकरणासाठी मनात आता कसलाही गैरसमज नाही; परंतु केंद्रावर गेल्यावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. एक वेळा गेलो तर खूप गर्दी हाेती, त्यामुळे निघून आलो. दुसऱ्यावेळी गेलो तर नेट बंद होते. माझ्यासारखे अनेक लोक असे वारंवार चकरा मारत आहेत. त्यात सुधारणा करावी, अशी अपेक्षा आहे.
- मनोज काळे, बीड
कोरोनाच्या भीतीने एवढ्या दिवस बाहेर निघत नव्हतो. सुरुवातीला मनात गैरसमज होते. आता ते सर्व दूर झाले आहेत. रोज आवाहन केले जात असल्याने मी जात होतो. तेवढ्यात सुभाष रोडला मला पोलिसांनी अडविले होते; परंतु माझ्या वयाचा विचार करून त्यांनी साेडले. मी लस घेऊन घरी परतलो आहे.
- माणिकराव मदने, बीड
पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी अडविले. आता तेवढे कडक नसले तरी आपण माहिती सांगायच्या अगोदर पोलिसांनी मारले तर काय करायचे? त्यापेक्षा लॉकडाऊन उघडल्यावर मी लस घेईल. बीडला नाही घेतली तर जवळच्या आरोग्य केंद्रात घेईल.
- महेश द. येवले, पाटोदा
लस घेण्यास यावे
लस घेणाऱ्यांना कोणीही अडविणार नाही. सामान्य नागरिकांनी कोणी अडविले तर खोटे न बोलता प्रामाणिकपणे येऊन लस घ्यावी. मनातील गैरसमज दूर करून लस घ्यावी. यामुळे आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहील.
- डॉ. आर.बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड