अंबाजोगाई : लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, अंबासाखर याठिकाणी होत असलेला उड्डाणपूल अर्धवट स्थितीत आहे. या उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देताच दिनांक २९ डिसेंबरपासून सेलूअंबा येथील टोलनाका सुरू करून कंपनीने वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे.
अर्धवट उड्डाणपूल व जागोजागी सिमेंट रस्त्याला गेलेले तडे, अशी रस्त्याची अवस्था असताना कंपनीने टोलवसुली सुरू केल्यामुळे वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. अंबासाखर याठिकाणी ऊसाचा कारखाना असल्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
एक वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम करण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे थातूरमातूर बुजविण्यात आले आहेत. अर्धवट असलेला उड्डाणपूल व खराब रस्ता, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याला गेलेल्या भेगा अशी रस्त्याची स्थिती असताना कंपनीने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करून वाहनचालकांकडून टोलची वसुली सुरू केली आहे. ही टोल वसुली त्वरित बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, यशराज कोळगिरे, ॲड. अमित गिरवलकर, सिद्धेश्वर स्वामी यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शेतकरी मोबदल्यापासून वंचित
अंबासाखर याठिकाणी दोन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. जमिनी संपादित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा मिळणे अपेक्षित होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बरेच शेतकरी मावेजापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी साप्ते यांनी व्यक्त केली.
...तर टोलनाका फोडणार
या रस्ताच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या असून, रस्ताचे काम संपत आले आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीच्या मावेजाची रक्कम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने व केंद्र सरकारने दिलेली नाही. दोन दिवसात जर टोल वसुली बंद केली नाही तर टोल नाका फोडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे मराठवाडा महासचिव ॲड. माधव जाधव यांनी दिला आहे.
उड्डाणपूल सोडता या रस्त्याचे काम बहुुतांशी पूर्ण झाले आहे. शासनाच्या आदेशाने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मावेजा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- रोहिदास गायकवाड (उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग)