अंबाजोगाई (जि. बीड) : रविवारी पहाटेपासूनच वातावरणात बदल झालेला होता. दाट धुके पसरले होते. बसचालक समोरील वाहनास ओव्हरटेक करताना समोरुन आलेला ट्रक दिसला नाही. पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रकवर डाव्या बाजूला आदळल्याने व जोराची धडक बसल्याने पत्रा फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील नांदगाव फाट्याजवळ एस.टी. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. वाहकासह तीन प्रवाशांचा मृतांत समावेश आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.
औरंगाबाद आगाराची बस (एमएच २० बीएल-३०१७) लातूरहून औरंगाबादकडे जात हाेती तर औरंगाबादहून यंत्रसामग्री घेऊन ट्रक (केए ५६-५४९४) हैदराबादकडे जात होता. नांदगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात बसमधील चौघेे जागीच ठार झाले. आदिल सलीम शेख (२९, रा. अंबाजोगाई), नलिनी मधुकर देशमुख (७२, रा. ज्योतीनगर, औरंगाबाद) , बसवाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (३६, रा. कांचनवाडी, औरंगाबाद) अशी मृतांची नावे असून, चौथ्या २९ वर्षीय मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. या दुर्घटनेत चौदाजण जखमी झाले. यांपैकी पाच गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, बस व ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक सुनील जायभाये, बर्दापूर ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक खरात, उपनिरीक्षक शिवशंकर चोपणे, सहायक उपनिरीक्षक लक्ष्मण बिडगर, महादेव आवले, पांडुरंग श्रीमंगले, राजाभाऊ थळकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठविले. उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील यांनीही भेट दिली.
ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. योगेश गालफाडे, डॉ. राकेश जाधव, डॉ. प्रमोद दोडे, डॉ. सतीश गिरेबोईनवाड, डॉ. अमित लोमटे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. अंकुश आस्वले, डॉ. कृष्णा नागरगोजे, डॉ. विपीन साखरे, इतरांनी तातडीने उपचार केले. सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पठाण, युसूफ भंगारवाले यांनी मदतकार्यात भाग घेतला.
यांचा जखमींत समावेशयोगिता भागवत कदम, भगवान निवृत्ती कांबळे, हरिमठ रघुनाथ चव्हाण,संगीता बजरंग जोगदंड (सर्व रा.लातूर),माधव नरसिंग पठारे ( रा.जालना), अयान पठाण , आसमा बेगम फहीम पठाण,जिहान फहीम पठाण (तिघे रा.बीड), दस्तगीर आयुब पठाण , अलादिन आमिर पठाण (दोघे रा.निलंगा), प्रकाश जनार्दन ठाकूर(रा. शिंदी ता.केज), बळीराम संभाजी कराड( रा. खोडवा सावरगाव), सुंदर ज्ञानोबा थोरात ( रा. पांगरी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरुण अभियंता गेलाया भीषण अपघात अंबाजोगाई येथील सदर बाजार येथील तरुण अभियंता आदील सलीम शेख( २९) हा ८ जानेवारी रोजी बहिणीला सोडण्यासाठी लातूर येथे गेला होता. ९ रोजी परतताना अंबाजोगाईकडे येत असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला. आदील हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
क्रेनने हटवली वाहनेअपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली . महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाल्याने अनेक वाहने भोकरंबा मार्गे लातूरकडे गेली. क्रेनद्वारे दोन्ही अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर तीन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.