उघड्या डीपीने धोक्याची शक्यता
बीड : तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरीत्या हात पोहोचतील अशा अवस्थेत आहेत. डीपींना दरवाजे बसले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. त्यामुळे संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवसा वीज पुरवा
पाटोदा : तालुक्यात महावितरणकडून थकीत वीज बिल वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान शेतात पाणी देण्याची गरज आहे. रात्री उशिरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात पाणी देण्यासाठी जागावे लागत आहे.
पाणीसाठा होतोय कमी
बीड : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमीकमी होऊ लागला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे नद्या, नाले कोरडे पडले आहेत. चांगला पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली होती, त्यामुळे विहीर, बोअरवेलचे पाणी मात्र बहुतांश ठिकाणी सुस्थितीत असल्याचे चित्र आहे.
वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ
धारूर : सध्या उन्हाची चाहूल लागली असून दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तालुक्यातील वन खात्याच्या दुर्लक्षतेमुळे वृक्षतोड वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. तसेच अनेकांकडूनही वृक्षतोड केली जात आहे. यासाठी वृक्ष संवर्धन केले जावे, असे मत वृक्षप्रेमींमधून व्यक्त केले जात आहे.