माजलगाव (बीड ) : शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही मोठया प्रमाणावर उघडयावरच सर्रास खाद्यपदार्थांची विक्री सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छता तर अनेकांकडे परवानेच नाहीत अशा परिस्थितीत नागरिकांच्या जिवीताशी चाललेल्या खेळावर आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या या कारवाईत स्विटमार्ट, जिलेबी सेंटर, हॉटेल तसेच हातगाडे आदी खाद्यपदार्थ विक्री ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली.
शहरातील संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक व बायपास या ठिकाणी सुमारे 100 ते 150 विविध खाद्यपदार्थांचे हातगाडे लागतात ज्यात वडापाव, जिलेबी, भजे, चिकन, अंडा ऑम्लेट, पावभाजी, चाईनिज आदी खाद्यपदार्थांची सर्रास उघडयावरच विक्री करण्यात येते. हे खाद्यपदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात व अस्वच्छ भांडयांमध्ये तयार केले जातात. पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जाते , अशा पध्दतीने तयार केले जाणारे निकृष्ट व अस्वच्छ पदार्थ खाल्याने नागरीकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो. सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे तर या पदार्थामुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत काही जागरूक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
सहाय्यक आयुक्त के.एन.दाभाडे व त्यांच्या पथकाने हरियाणा जिलेबी सेंटरची झाडा झडती घेतली असता या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता , गलिच्छ भांडे तसेच जिलेबी तळण्यासाठी वापरण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे तेल, जिलेबीत अखाद्य रंगांचा वापर होत असल्याचे त्यांना आढळुन आले. गुरुकृपा स्विटमार्ट मधील विविध खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून सिल करण्यात आले. अनेक हॉटेल, हातगाडे, स्विटमार्ट इत्यादींवर कारवाईची पक्रिया दिवसभर सुरु राहिली. अधिक तपासणीसाठी या ठिकाणाहून खाद्यपदार्थांची नमुने ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक दुकानदारांनी कारवाईच्या भितीने दुकाने बंद करून पळ काढला.
कठोर कारवाई करण्यात येईल माजलगांव शहरात विनापरवाना व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणारांची संख्या मोठी आहे. अशा दुकानधारकांवर या पुढे देखील सातत्याने कारवाई करण्यात येईल. विक्रेत्यांनी योग्य परवाने घ्यावेत. प्रतिष्ठाने स्वच्छ न ठेवल्यावर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. - के.एन. दाभाडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बीड