कडा : अन्न व औषध पुरवठ्याच्या एका पथकाने आष्टी तालुक्यातील ५ दुध संकलन केंद्रावर आज सकाळी ८ वाजता धाड टाकली. संबंधित संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील वाघळूज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी अमिया या गावातील दुध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या एका पथकाने आज सकाळी धाड टाकली. या केंद्रातील दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत. मुंबई येथील अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न भेसळ व सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु आहे. विभागातील जवळपास २५ अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यात ठाण मांडून आहे.
दरम्यान, तालुक्यातील टाकळी अमिया येथील वाघजाई मंदिर परिसरातील खाजगी जागेत काही रिकामे ड्रम आढळून आले आहेत. या ड्रमबाबतसुद्धा हे पथक कसून तपास करत आहे.