- नितीन कांबळे कडा (बीड) : नवरात्र उत्सव असल्याने सध्या भाविक उपवास करत आहेत. उपवासादरम्यान भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना देवळाली येथे आज उघडकीस आली आहे. पाच जणांना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आष्टी तालुक्यातील देवळाली येथील राधा सखाराम खाडे देवळाली, शोभा विष्णू तांदळे, पवन विष्णु तांदळे, प्रशांत विष्णु तांदळे, विष्णु बाबूराव तांदळे, यांनी बुधवारी सकाळी गावातील एका दुकानातून भगर आणली होती. त्याच्या भाकरी करून सकाळी दहा अकराच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर थोड्या वेळात भगर खाणाऱ्यांना चक्कर, मळमळ, सुरू झाले. सर्वांना घाटापिंपरी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
याबाबत देवळाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, रूग्णाची तपासणी करून विषबाधा कशाने झाली याचे नमुने घेण्यात येतील असे त्यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यानंतर आता आष्टीमध्येही भगरीमधून विषबाधा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.