माजलगाव (बीड) : एकादशीच्या उपवासासाठी खालेल्या भगरीच्या पिठामुळे उमरी, रोषणपुरी, कोथरळ , छत्रबोरगाव येथील अनेकांना विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी घडली. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात जवळपास 100 महिला, पुरुष रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पौष महिन्यातील एकादशी असल्याने ग्रामीण भागात अनेकजण हा उपवास करतात. गुरुवारी दि. १७ उमरी, रोषणपुरी, कोथरूळ, छत्र बोरगाव येथील नागरिकांनी एकादशीच्या उपवासाच्या फराळासाठी गावातील किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले. दोन दिवसापूर्वी एका खाजगी व्यक्तीकडून येथील दुकानदारांनी हे भगरीचे पीठ खरेदी केल्याचे सांगण्यात आले. हेच पीठ गुरुवारी ग्रामस्थांना विकले.
फरळासाठी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या पण दुपारनंतर उमरी गावातील चार, पाच जणांना उलटी, पोट दुखणे व जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने काहीजण शहरातील खाजगी रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर असा त्रास होणारांची संख्या ईतर गावातूनही वाढत गेली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उमरी, रोषणपुरी, कोथरुळ येथील जवळपास 100 रुग्ण दाखल झाले. यात 70 महिला रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करण्यात येत असून अत्यावस्थ रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जागा अपुरी पडत असल्याने रुग्णालयातील एका खाटावर दोन रुग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णावर उपचार केले. यात डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, डॉ. दत्तात्रय पारगावकर, डॉ. आनंद उघडे, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रसाद कुलकर्णी सहभाग होता.
रुग्णांची प्रकृती स्थिर आहे काही अत्यावस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले आहे. तर येथे दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.- डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी.
रुग्णांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत, पहा व्हिडीओ :