बीड : घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. जबरी चोरीचा हा प्रकार समजल्यानंतर बीड ग्रामीण पालीस ठाण्याचे अधिकारी, दरोडा प्रतिबंधक विभाग, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. घटनास्थळी पाचारण केलेल्या श्वान पथकाची याकामी मदत घेण्यात आली.तालुक्यातील आहेर चिंचोली येथे श्रीकृष्ण बन्सीधर बहीर यांच्या वाड्यात पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चार जणांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. काहीतरी वाजत असल्याने श्रीकृष्ण बहीर व इतर जागे झाले. दरम्यान चोर अचानक घरात घुसल्याने कुटुंबातील सदस्य घाबरले होते. चोरट्यांनी धमकावत दहशत पसरविली. घरातील दोन्ही कपाट फोडून नगदी पाच हजार व सोने-चांदीचे ९४ ग्रॅम दागिने असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. घरातील एक पेटी चोरट्यांनी जवळच्या शेतात नेऊन फोडली. त्यातील काही ऐवज नेऊन रिकामी पेटी शेतात फेकून दिली. घटनेची माहिती श्रीकृष्ण बहीर यांनी बीड ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर सपोनि सुजीत बडे, दरोडा प्रतिबंधक विभागाचे पो.नि. गजानन जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात कलम ३९२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल असून, अधिक तपास उपनिरीक्षक सुरेश माळी हे करत आहेत.अंबाजोगाईमध्ये मोबाईलचे दुकान फोडलेअंबाजोगाई येथील छत्रपती व्यापारी संकुलातील अंकुश मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ४५ हजार ९९० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अंकुश सुरवसे यांचे हे दुकान असून, चोरट्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील नवे- जुने मोबाईल, पॉवर बँक, पेन ड्राईव्ह, ब्ल्यूटूथ, मेमरी कार्ड, हेडफोन तसेच ग्राहकांचे दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल व नगदी ८ हजार रुपये असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आहेर चिंचोलीत जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:59 PM
घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली.
ठळक मुद्देघरात घुसलेल्या चोरट्यांनी धमकावत लुटला दीड लाख रुपयांचा ऐवज