गंगामसला (बीड ) : राज्यातील नामांकित देवस्थान असलेले माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील श्रीक्षेत्र मोरेश्वर, याठिकाणी शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपत्नीक महाअभिषेक करून राज्यात पुन्हा एकदा कॉग्रेस आघाडीचे सरकार येऊन सामान्यास समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे मोरेश्र्वर भालचंद्रास घातले असावे, यावेळी मोरेश्वरास काय मागितले या प्रश्नावर त्यांनी तो माझा व मोरेश्वरातील विषय आहे असे मिश्कीलपणे सांगितले.
राज्यात काही महिन्यापासून लोकसभा निवडणुक असो किंवा पक्षीय राजकारणात कॉग्रेसची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. त्यात पक्षाचे राज्याचे बडे नेते असलेले अशोक चव्हाण यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. आत्ता आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्शभूमीवर येणारे विघ्नावर मात करून, यश मिळावे. कॉग्रेस आघाडीची सत्ता राज्यात स्थापन व्हावी, यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रथमच तालुक्यातील गंगामसला येथील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या पुरातन अशा मोरेश्र्वर भालचंद्रास पत्नी अमिता चव्हाण यांच्यासह शुक्रवारी ( दि.१३ ) सकाळी ११ वा. महाअभिषेक केला.
यावेळी त्यांच्या समवेत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, हरिभाऊ सोळंके, शेख रशिद याची उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी गंगामसला ग्रामस्थांच्या वतीने माजी पं.स.सदस्य श्रीकृष्ण सोळंके, अॅड.हरिभाऊ सोळंके, एन.टी.सोळंके, सचिन सोळंके, सोपानराव सोळंके आदींनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्वागत करून मोरेश्वराची प्रतिमा भेट दिली.चव्हाणांचे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेले नाते या निमित्ताने पहावयास मिळाले.