बीड: शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ ऑगस्ट रोजी शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिवदेह अंतिम दर्शनासाठी ठेवले आहे. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. असं कसं झालं... आमचा वाघ गेला.. अशा शब्दांत कुटुंबियांनी आक्रोश केला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे चिंब झाले होते.सामान्य कार्यकर्ता ते राज्यपातळीवरील नेता असा विनायक मेटे यांचा संघर्षमय प्रवास होता.
सार्वजनिक जीवनात संघटन बांधणी करताना, मराठा आरक्षण चळवळ पुढे नेताना ते कुटुबांला फार वेळ देऊ शकत नव्हते, पण व्यस्त जीवनशैलीत ते कुटुंबातील लोकांशी हितगुज साधत. १३ ऑगस्ट रोजी मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी राजेगाव(ता.केज) येथे मूळ गावी जाऊन वृद्ध आईची भेट घेतली. आईसाठी त्यांनी गावी नवीन वास्तू बांधली होती. २२ ऑगस्ट रोजी गृहप्रवेश सोहळा ठरला होता. मात्र, नियतीच्या मनात काही औरच होते. माय-लेकराची ही भेट अखेरची ठरली.
विनायक मेटे यांच्या निधनाने आई,भाऊ,मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. त्यांना लाडाने घरी बप्पा म्हणत. त्यांच्या एकेक आठवणी जागवत कुटुंबियांनी आक्रोश केला.त्यांच्या ८० वर्षांच्या मावशीने माझ्या बप्पाचे असे कसे झाले, आम्ही कोणाकडं पाहायचं, असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. अंतर्मनातून त्यांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.ग्रामीण भागातून महिला, वृद्ध देखील मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.