बीड: राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने तब्बल पाच वेळा विधानपरिषदेचे सदस्यत्व भूषविणारे शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांना धक्का बसला. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात अपवाद वगळता सलग अडीच दशके त्यांची तोफ धडाडत राहिली. मात्र, हे वादळ दुर्दैवाने थंडावले. त्यांच्या पार्थिवावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह इतर दिग्गज नेते येणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. सामान शेतकरी कुटुंबातील विनायक मेटे यांनी मराठा महासंघातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसंग्रामची स्थापना करून मराठा आरक्षण चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सलग पाच वेळा विधानपरिषदेत आमदार म्हणून कर्तृत्व गाजविले. मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्नांवर ते झगडत राहिले होते. विनायक मेटे यांना अंतिम निरोप देण्यासाठी राज्यभरातून समर्थक बीडमध्ये दाखल झाले आहेत.शिवसंग्राम भवन येथे अंतिम दर्शनासाठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,रामदास आठवले यांचा दौरा निश्चित आहे. मात्र, ऐनवेळी काही मंत्री, आमदार येण्याची शक्यता आहे.जालना, उस्मानाबादहून मागवली कुमक
दरम्यान, अंत्ययात्रेला अलोट गर्दी होणार आहे. अनेक मंत्री, आमदार येणार आहेत,त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके हे तळ ठोकून आहेत. जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कुमक पाचारण करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.