धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. सहा महिन्यांच्या आत बांधलेली भिंत पडून गेली. ती बांधण्यासाठी किल्लेप्रेमींनी पाठपुरावा केला. यानंतर शहरातील नागरिकांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, पुरातत्त्व विभागाने प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षक कमी केल्यामुळे किल्ल्यात मद्यपी, आंबटाशौकिनांनी हैदोस घातला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे.
धारूर येथील ऐतिहासिक किल्ला तब्बल चाळीस एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याची मोठी पडझड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी शहरातील किल्लाप्रेमींनी मोहीम राबवत आंदोलने करीत, निवेदने देत किल्ल्याच्या डागडुजीसाठी तीन टप्प्यांत सात कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व विभागाकडून मंजूर करून घेतला. दर्शनीय भागात पडझड झालेल्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. पूर्वीप्रमाणे भव्यदिव्य असे प्रवेशद्वार बसविण्यात आले. बाहेरील सर्व चोर रस्ते बंद केले. त्यामुळे प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश करता येऊ लागला. याठिकाणी खासगी सुरक्षा संस्थेचे दोन सुरक्षारक्षकही नेमले होते. यामुळे किल्ल्यात होणारे गैरप्रकार बंद झाले. दरम्यानच्या काळात डागडुजी केलेल्या भिंती निकृष्ट कामामुळे ढासळल्या. हे काम करण्यापूर्वी कंत्राटदाराला पाच वर्षांची जबाबदारी देण्यात आलेली होती. मात्र, कंत्राटदार काम करण्यास चालढकल करताच किल्लेप्रेमींनी पुराततत्त्व विभागाच्या विरोधात मोहीम राबवत विभागीय सहायक संचालक अजित खंदारे यांना जाब विचारला होता. यानंतर कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम करावे लागले. हे काम करताना किल्लेप्रेमींनी दर्जेदार काम करण्याकडे लक्ष दिले. तेव्हापासून पुरातत्त्व विभागाने किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही शहरातील नागरिकांनी केला आहे. याच काळात राज्य पुरातत्त्व विभागाने नेमलेले दोन सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे किल्ल्याचा दरवाजा बंद करण्यासाठीही कोणीही कर्मचारी त्याठिकाणी हजर नसतो. त्यामुळे दारुड्यांचा हा अड्डा बनला आहे. याशिवाय अनेक आंबटशौकीनही किल्ल्यामध्ये फिरताना आढळत आहेत. कोणतेही बंधन नसल्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. रविवारी कायाकल्प प्रतिष्ठानतर्फे रविवारी किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविताना आडोशाला मद्याच्या रिकाम्या बाटल्याचे ढीग आढळून आले. तसेच इतरही अक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जपण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणीही प्रतिष्ठानतर्फे पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली आहे.
चौकट,
सहायक संचालकांनी नंबर केले ब्लॉक
शहरातील किल्लेप्रेमी किल्ल्यात होणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांच्याकडे सतत करीत असतात. किल्ल्यात डागडुजींचे निकृष्ट दर्जाचे काम होत असतानाही त्याविषयी पाठपुरावा संचालकांकडे करण्यात आला होता. मात्र, सहायक संचालकांनी धारुर शहरातून सतत तक्रारी करणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केले असल्याची माहिती दुर्गप्रेमी विजय शिनगारे यांनी दिली. त्यामुळे यापुढे सहायक संचालकांच्या गैरकारभाराचा पाढा सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या वाचण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याविषयी सहायक संचालक अजित खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.