लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेल्या काळ्या वाहनामुळेच वाल्मीक कराडसह त्याचे आठ साथीदार आणखी अडकणार आहेत. कारण याच वाहनात (एमएच४४/झेड९३३३) देशमुख यांचे रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच मोबाइल, टी-शर्ट असे जवळपास २० पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. दोषारोपपत्रातून हे समोर आले आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३:२२ वाजता सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले. त्यानंतर त्यांचे काळी जीप व कार या दोन वाहनांमधून अपहरण केले. आरोपींनी प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाइप, क्लच वायर व काठीचा वापर केला. देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन गेले. तेथे अमानुष मारहाण करत खून केला. सायंकाळी ६:३० वाजताचे सुमारास त्यांचा मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले होते.