बीड : गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे पाच वर्षांपूर्वी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात चार आरोपींना उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी सुनावली.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका विवाहितेला बीडला जाण्यासाठी १ जानेवारी २०१५ रोजी एका जिपमध्ये चौघांनी बसवले. बीडला जात असताना एरंडगाव येथील निर्मनुष्य असलेल्या गायरानाच्या ठिकाणी घेऊन जात सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिलेला पाचेगाव येथील घरी घेऊन जात त्याठिकाणी पुन्हा आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याची माहिती कोणाला सांगितल्यास पुन्हा अत्याचाराची धमकी दिली. घबारलेल्या पिडित महिलेने दुसऱ्या दिवशी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरुन जिजा लालसिंग राठोड, अमोल मदन काष्टे, कुंडलिक बन्सी राठोड आणि नवनाथ बाबुराव जाधव यांच्यावर सामूहिक बलात्कारासह इतर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दोन दिवसात आरोपींना अटक केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव सिंग यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. बीड जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. एकूण दहा साक्षीदार होते. यातील पंच साक्षीदार फितूर झाले. मात्र पीडित महिला, तिचा पती, वैद्यकीय अधिकारी, ओळखपरेड घेणारे नायब तहसीलदार, गुन्हा नोंदविणारे एपीआय तळेकर, तपासी अधिकारी गौरव सिंग यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश हेमंत महाजन यांनी निकाल दिला. यात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
...अशी सुनावली शिक्षा न्यायाधिश हेमंत महाजन यांनी आरोपी जिजा राठोड, अमोल काष्टे, कुंडलिक राठोड, नवनाथ जाधव यांना कलम ३७६ ड नुसार उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३६६, ४५८ नुसार प्रत्येकी ७ वर्षे शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, कलम ३९४ नुसार १० वर्षे शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड.च् कलम ३२४, ५०६ नुसार प्रत्येकी २ वर्षे शिक्षा व एकहजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. सहायक जिल्हा सरकारी वकील मिलिंद वाघिरकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.