लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात चोरी, घरफोडी व वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मावळत्या वर्षाला निरोप दिला जात असताना बीड, केज व धारुरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बीड शहरातील एका रुग्णालयातून अज्ञाताने तब्बल ५३ हजारांची रक्कम लंपास केली तर केज शहरातील वकीलवाडी येथे घरफोडी झाली. धारुर तालुक्यातील कोळपिंप्री जिल्हा परिषद शाळेचे ग्रंथालय फोडून चोरट्यांनी पुस्तके लंपास केली. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बीड शहरातील पेठ बीड भागात डॉ. लक्ष्मण जाधव यांचे खासगी रुग्णालय आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या रुग्णालयातील केबीनमधील टेबलच्या ड्राॅव्हरमध्ये ठेवलेली ५३ हजारांची रक्कम अज्ञाताने हातोहात लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. जाधव यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी गुरुवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना केज तालुक्यातील वकीलवाडी येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. काजल मयूर अंधारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत घरातील सोन्याचे ४० हजारांचे दागिने व २५ हजारांची रोकड असा ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर काजल अंधारे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन अधिक तपास करत आहेत.
कोळपिंप्री शाळेत पुस्तकांसह साहित्य चोरीला
धारुर तालुक्यातील कोळपिंप्री येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी या शाळेतील ग्रंथालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील दोन हजार रुपयांची विविध पुस्तके तसेच दोन हजार रुपयांची विविध शैक्षणिक खेळणी असा ४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शाळेचे मुख्याध्यापक महादेव तिडके यांच्या फिर्यादीवरुन धारुर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन चोरीचे सत्रही सुरुच
जिल्ह्यात वाहन चोरीचे सत्र सुरुच आहेत. बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील पिताजी प्राईड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सिद्धेश बोपलकर यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एमएच २३ एक्यू ७७७३) ही बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पळवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत माजलगाव येथील जुना बाजार रस्त्यावरुन शेख रहीम शेख अजमत यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एमएच२३ एई २४४८) चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.