बीड : निवृत्त शिक्षकाचे थकलेले वेतन आणि निवृत्तीचा लाभ देण्यासाठी खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागणी करून दीड लाख रुपये स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीसह संस्था अध्यक्षास बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई केजमध्ये २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता करण्यात आली. चौघांवर केजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध संस्थेच्या वतीने उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा (ता. केज) या संस्थेचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील मुख्याध्यापक अनंत बाबूराव हांगे, सानेगुरुजी विद्यालय तांबवा संस्थाध्यक्ष उद्धव माणिकराव कराड व खासगी व्यक्ती दत्तात्रय सूर्यभान धस यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारदाराकडे तिघांनी १२ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपये देण्याचे ठरले. दत्तात्रय धस याचे केजमध्ये औषधी दुकान असून, लाचेची दीड लाख रुपयांची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचला. दत्तात्रय धस याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर संस्थाध्यक्ष उद्धव कराड यास अटक केली आहे. सचिव अशोक चाटे व मुख्याध्यापक अनंत हांगे हे दोघे फरार झाले होते. दुसऱ्या दिवशी दोघेही स्वत:हून बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले. उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस, हवालदार सत्यनारायण खेत्रे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, स्नेहलकुमार कोरडे, संतोष राठोड, अविनाश गवळी व चालक गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नैतिकतेचे धडे देणारेच लाचखोरीत अडकल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अध्यक्षाला पोलीस कोठडी दरम्यान, दीड लाख रुपये स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीसह संस्था अध्यक्षाला ३ एप्रिल रोजी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर, फरार गजानन शिक्षण संस्थेचा सचिव अशोक चाटे व गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील मुख्याध्यापक अनंत हांगे हे दोघे ३ एप्रिल रोजी दुपारनंतर स्वत:हून बीड येथील एसीबी कार्यालयात हजर झाले. औषधी विक्रेता दत्तात्रय धस व संस्थाध्यक्ष उद्धव कराड यांना ३ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.