बीड : परळीत चार वर्षांपूर्वी गाजलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ मार्चला चौघांना अटक केली. कृषी विभागाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह विद्यमान दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाजी शंकरराव हजारे (रा.अंबाजोगाई), विजयकुमार अरुण भताने, पांडुरंग जगन्नाथ जंगमे, अमोल मारोतीराव कराड (तिघे रा.परळी) अशी आरोपींची नावे आहेत. हजारे व भताने हे निवृत्त तालुका कृषी अधिकारी असून कराड व जंगमे हे कृषी सहायक म्हणून सध्या सेेवेत आहेत.
२०१८ मध्ये परळीत जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले होते. सुमारे दोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अधिकारी व कंत्राटदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले होते. अधिकाऱ्यांवर परळी शहर ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यांत १२ जणांना अटक केली होती, उर्वरित फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासासाठी होते. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र पाठविले होते. दरम्यान, फरार चाैघे परळीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. हरिभाऊ खाडे यांना मिळाली होती. त्यानुसार, १४ मार्चला त्यांनी सहायक निरीक्षक प्रमोद भिंगारे, हवालदार मुकुंद तांदळे, राम बहिरवाळ, पोलीस नाईक राजू पठाण, पोलीस अंमलदार संजय पवार यांना रवाना केले आणि अटक केली.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडीदरम्यान, पकडलेल्या चार आरोपींना परळी न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी दिली.