बीड: एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांच्याही घरांची झडती घेणे सुरू असून रोख रक्कम व एफ. डी. सापडल्याचे सूत्रांकडून समजते.
बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके याच्याकडे एका वादाची सुनावणी सुरू होती. याचा निकाल बाजुने देण्यासाठी शेळकेने दोन लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने याची तक्रार बीड एसबीकडे केली. त्यांनी सापळा लावून लाच स्विकारताना कारकुन बब्रुवाहन फडसह शेळकेला रंगेहाथ पकडले होते. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाई होताच शेळकेच्या औरंगाबाद येथील घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली. यामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी, लाखो रूपयांच्या एफ.डी.आढळून आल्या होत्या. शुक्रवारीही फड व शेळकेच्या घरांची झडती घेणे एसीबीकडून सुरूच होते. बीडमधील घरांमध्येही रोख रक्कम व एफ.डी.आढळल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले. एकुण किती आणि काय काय मिळाले, याची सविस्तर माहिती येण्यासाठी आणखी एक दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले.