लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन दिवसांपासून बीड शहरात तळ ठोकून असलेली केंद्रीय समिती बीड शहराची तपासणी करून बुधवारी परतली. या समितीने सार्वजनिक शौचालय, शाळांच्या तपासणीसह झोपडपट्टी परिसराची पाहणी केली. बीड शहरातील कामांबद्दल समितीने समितीने समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता चार दिवसानंतर बीड शहर हागणदारीमुक्त झाले की नाही? याचा ‘निकाल’ लागणार असून सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘बीड शहर, हागणदारीमुक्त शहर’ करण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. २८ ओडी स्पॉट तयार करून त्याठिकाणी अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. तसेच सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करून ते वापरात आणले होते. तसेच वैयक्तिक शौचालय बांधण्यासह ते वापरण्यासाठी आवाहन केले जात होते. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणा-यांची संख्या कमी झाली होती. पालिकेला हे परिश्रम कामी आले आहे. दोन दिवस केंद्रीय समितीने तपासणी, पाहणी करून या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळीच ही समिती पालिकेत दाखल झाली. प्रत्येक कागदपत्र आणि तपासणी ‘लाईव्ह’ केली जात होती. त्यानंतर समितीने व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील शौचालयांची पाहणी केली. बार्शी नाका परिसरातील अशोक नगर भागातील जि.प.शाळा व संस्कार विद्यालयांचीही पाहणी केली. तसेच नगरसेवकांकडूनही आपल्या प्रभागात कोणीही उघड्यावर जात नसल्याबाबत घोषणापत्र घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.बुधवारी सायंकाळी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी समितीचे समन्वयक केतन माळी यांचा सत्कार केला.
यावेळी उपमुख्याधिकारी राहुल साठे, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, भारत चांदणे, सुनील काळकुटे, ज्योती ढाका, श्रद्धा गर्जे, गौरव दुधे, समन्वयक वसीम पठाणसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, समिती परत जाताच स्वच्छता विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
आता निकालाकडे लक्षपाहणी करून समिती परतली आहे. आता याचा अहवाल चार दिवसानंतर येणार आहे. काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.समितीने पॉझिटिव्ह निकाल दिला तर स्वच्छ सर्व्हेक्षण-२०१८ मध्ये १५० गुण मिळतील.हे गुण मिळाल्यावर बीड नगर पालिकेला देशांतील पालिकेंशी सामना करता येणार आहे.