बीड : मारामारी, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परळी येथील चार गुंडांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
लक्ष्मण गंगाराम गवारे, अजय कृष्ण गवारे, महादेव उर्फ महादु उर्फ संदिप मारोती गवारे, सुरेश अर्जून गवारे (सर्व रा.परळी) अशी हद्दपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. परळी व तालुक्यात या गुंडांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मारामारी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत. वारंवार अटक केल्यानंतरही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नव्हती.
हाच धागा पकडून परळीतील संभाजीनगर ठाण्याचे पोनि उमेश कस्तूरे यांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी याची चौकशी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी त्यांच्यावर वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.