अंबाजोगाई : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांना आरोग्य सुविधा मिळण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी समर्थकांसह स्वारातीच्या अपघात विभागासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून उपाययोजनांचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलन चिघळेल या भीतीपोटी पोलीस दलास पाचारण करण्यात आले होते; परंतु मुंदडा यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अधिष्ठातांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
डॉक्टरांची कमतरता, रिक्त असलेली पदसंख्या या सर्व गोष्टींमुळे कोरोनावर मात करण्यासाठी स्वाराती प्रशासन हतबल झाले आहे. लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये शेकडोच्या संख्येने रुग्ण आजही बेडसाठी ताटकळत बसले आहेत. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा मिळणे गरजेचे असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अक्षय मुंदडा, सभापती मधुकर काचगुंडे, नेताजी शिंदे, महादेव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, ॲड. संतोष लोमटे, खलील मौलाना, शेख ताहेर, बाला पाथरकर, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, नूर पटेल यांच्यासह शेकडो मुंदडा समर्थकांनी आंदोलन केले.
आंदोलनानंतर प्रशासन लागले कामाला
स्वाराती रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या समस्यांवर आंदोलन केल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून, त्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत; परंतु भाजप नेते मुंदडा यांच्या आंदोलनानंतरच प्रशासन जागे झाले असले तरी यापूर्वी सूचना करूनही उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल अंबाजोगाईकर विचारत आहेत.
सूचना करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपण वेळोवेळी स्वाराती प्रशासनासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर रुग्णांची हेळसांड झाली नसती. औषधांसह ऑक्सिजन दोन दिवसांपुरताच साठा असेल, तर आजपासूनच त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-आ. नमिता मुंदडा, विधानसभा सदस्य
ऑक्सिजन, बेडची कमतरता भासू देणार नाही
स्वाराती रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असून, त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी स्वाराती प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे. गरज पडली तर मेडिसिन विभागाची २३० खाटांची इमारत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वाॅर्डात सध्या ऑक्सिजन सुविधा बसविणे सुरू असून, काही दिवसांतच संपूर्ण इमारत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. -डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय
वाढत्या मृत्यूंना जबाबदार कोण?
लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात अत्यवस्थ होत जाणाऱ्या २२ रुग्णांना स्वाराती रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आपण सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. जर अत्यवस्थ रुग्णांना दाखलच करून घ्यायचे नसेल, तर रुग्ण उशिरा रुग्णालयात येतो, हा असा उलटा कांगावा कशासाठी? असा सवाल नंदकिशोर मुंदडा यांनी केला आहे.
===Photopath===
140421\avinash mudegaonkar_img-20210414-wa0079_14.jpg