लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात शनिवारी रात्री ते रविवारी दिवसभरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार ठार झाले.घनसावंगी तालुक्यातील गुंजमुर्ती येथील भाऊराव भोसले (वय २७) व त्यांच्या पत्नी नंदा भोसले (वय २४) या माजलगाव येथून मोटारसायकलने (एमएच २१ बीके ६०२१) गावाकडे राजेगांव मार्गे जात होते. राजेगांव येथील वळण रस्त्यावर गेवराईहून माजलगांवकडे येणाऱ्या बसने (एमएच २० बीएल १७५९) जोरदार धडक दिली. या अपघातात पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजता घडली. दरम्यान घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला.दुसरा अपघात पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथे बीड -नगर महामार्गावर रविवारी सकाळी अकरा वाजता घडला. पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालेल्या एका इसमाचा मृतदेह बीड येथे पोहोचविल्यानंतर परतणा-या खाजगी रुग्णवाहिकेने पाठीमागून धडक दिल्याने नीता कृष्णा भोसले (४०) ही महिला ठार झाली. तर विमल प्रभाकर भोसले (५०) नामक महिला जखमी असून बीड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निरगुडी येथील शेतवस्तीवर राहणा-या दोघी सत्संगासाठी गेल्या होत्या. अपघातानंतर चिडलेल्या लोकांनी चालकाला बेदम चोप देत रुग्णवाहिका फोडली. याही अवस्थेत चालक रु ग्णवाहिका घेऊन पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.तिसरा अपघात शनिवारी रात्री बारा वाजता पाटोदा - परळी निर्माण स्थित महामार्गावर बामदळेवाडी नजीक घडला. चाकरवाडीहून पुण्याकडे खवा नेणारा टेम्पो (एमएच २३ डब्ल्यू २५८६) उलटल्याने वृंदावणी ज्ञानोबा पवार (६५, रा. चाकरवाडी ता. केज) ही महिला ठार झाली. टेम्पोत पवार यांच्यासह पाच प्रवासी प्रवास करत होते. उदगीर - लातूर - नगर या राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम भरावाचे काम केलेले आहे. समोरून येणाºया वाहनास साईड देताना दबई न केलेल्या भरावावर टेम्पो गेला. चालकाला अंदाज न आल्याने टेम्पो उलटला. चालकाविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:52 AM