अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी/चतुरवाडी येथील ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. सोबतच, या चारही सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ०१ जून रोजी दिले.
शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा व मदन परदेशी यांनी आपले पॅनल उभा केले होते. शहरापासून जवळच व जास्त उत्पन्नाची ग्रामपंचायत असल्याने या निवडणूकीत चांगलीच रंगत आली होती. परंतु मोदी - मुंदडा यांच्यावर मात करीत परदेशी यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे. निवडणूकीस उभा राहीलेल्या सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेच्या आत दाखल करणे बंधनकारक असते. खर्च सादर न करणाºया उमेदवारांवर अपात्रतेची कार्यवाही होऊ शकते.
याठिकाणी निवडून आलेल्या माया अमोल साखरे, छाया माणिक खांडेकर, अमोल रामकृष्ण पवार, अमोल किशनराव विडेकर या चार सदस्यांनी आपला निवडणूक खर्च विहीत वेळेत सादर केला नव्हता. ग्रामपंचायत कलम १४ (अ) (ब) अधिनियम १९९८ चा भंग केल्याने या निवडून आलेल्या सदस्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांचा विरोधात उभा राहिलेले तस्लीम अजीत शेख, अनिता सुर्यकांत घाडगे, दत्ता भगवान बोडके, श्रीकांत नारायण जोशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. हे सदस्य मोठ्या प्रमाणात अपप्रचार व आर्थिक भष्ट्राचार करुन, मतदारांना पैशांचे प्रलोभन देवून अवैध पध्दतीने निवडून आलेले आहेत.
त्यामुळे ते निवडणूक खर्च सादर करु शकले नाहीत अथवा ते जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आलेले आहेत, असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांची चौकशी होऊन त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. याप्रकरणी तक्रारदारांच्या वतीने अॅड. इस्माईल गवळी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. इम्तियाज शेख आणि अॅड.प्रमोद शिंदे यांनी सहकार्य केले.
हिशोब देण्यात कसूर केल्याचा ठेवला ठपकाचार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने याची चौकशी उपजिल्हाधिकाºयांनी केली. सर्वांची बाजू ऐकून घेतली. चौकशीअंती माया अमोल साखरे, छाया माणिक खांडेकर, अमोल रामकृष्ण पवार, अमोल किशनराव विडेकर यांनी हिशोब देण्यात कसूर केल्याचे सिद्ध झाले. या कसुरी साठी त्यांच्याकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात येत असून पाच वर्षे ग्राम पंचायत निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्यात येत असल्याचे सिंह यांच्या आदेशात नमूद आहे.