बीड : जिल्ह्यात वाळू उपसा करण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने संगम जवळा येथे गुरुवारी कारवाई करीत चार ट्रॅक्टर व इतर साहित्य असा ३२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी चार चालक व ट्रॅक्टर मालकांविरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम जळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशेष पथकाला गुरुवारी मिळाली होती. त्यांनी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी धाव घेतली व मुद्देमालासह चालकांना ताब्यात घेतले. यावेळी मजुरांच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना चार ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून गेवराई पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले. ४ ट्रॅक्टर व वाळू असा एकूण ३२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सुनील गिरीजा मगरे, बाबासाहेब नारायण शिंदे, शाम भानुदास देवकते, नारायण अशोक पारेकर (सर्व रा. रेवकी-देवकी ता. गेवराई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख सपोनि विलास हजारे व सहकाऱ्यांनी केली.