बीड : केंद्र सरकारने १५ वर्षांपुढील सरकारी-खासगी गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बीड पालिकेतील चार गाड्या भंगारात जाणार आहेत. साधारणत २००४ साली त्यांची खरेदी झालेली आहे. सध्या त्यांना १७ वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे.
बीड नगरपालिकेत सध्या २८ घंटागाड्या, २ जेसीबी, १ टेम्पो, ३ डम्पर प्लेसर, २ फॉगिंग मशीन, १ ऑईल फवारणी मशीन, १ विद्युत विभागाची शिडी उभारणारी गाडी अशी ३८ वाहने आहेत. ही सर्व वाहने सध्या काम करतात. परंतु, यातील २ फॉगिंग मशीन, १ ऑईल फवारणी मशीन व १ विद्युत विभागाची शिडी उभारणारी गाडी अशी चार वाहने २००४ साली पालिकेने खरेदी केली होती. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार या चारही वाहनांना १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर चालण्यास अयोग्य आहेत. निर्णयानुसार ही चारही वाहने भंगारात जाणार आहेत. असे असले तरी पालिकेला अद्याप याबद्दल काहीच पत्र आलेले नाही. त्यामुळे ही चारही वाहने सध्या बीड पालिकेत कार्यरत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास संपर्क केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता.
घंटागाड्यांचाही कालावधी आला संपत
बीड पालिकेतील २८ घंटागाड्यांपैकी जवळपास १० पेक्षा जास्त गाड्यांना ८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या वाहनांना आरटीओच्या नियमाप्रमाणे टॅक्स आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, अधिकृत काहीच पत्र मिळाले नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत अधिकृत सांगता आले नाही.
आकडेवारी
एकूण वाहने ३८
भंगारात जाणारी वाहने - ४