कडा : भरधाव वेगातील चारचाकीने दिलेल्या धडकेत अहमदनगर येथून लिंबोडी या गावाकडे परतणारा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला. रावसाहेब भास्कर आंधळे (३८ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघातबीड- नगर रोडवरील वाघळुज येथे रविवारी सायंकाळी झाला.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रावसाहेब भास्कर आंधळे हा रविवारी घरगुती कामानिमित्त अहमदनगर येथे गेला होता. सायंकाळी काम आटोपून तो दुचाकीवरून (MH 12 , EF.1294) गावाकडे परतत होता. प्रवासादरम्यान बीड-नगर रोडवरील वाघळूज येथे कड्यावरून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकीने (MH.16 BJ.7621) रावसाहेबच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात रावसाहेब खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघाती मृत्यू झाल्याने लिंबोडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.