लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दिल्ली येथील एका कन्सल्टन्सीच्या नावाने अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील बेरोजगार युवकास बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कापोटी त्याच्याकडून ४३ हजार २४६ रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फसवणुकीचा हा प्रकार दोन महिन्यापूर्वी सुरु झाला. लोखंडी सावरगाव येथील योगेश महादेव शेळके यास १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दिल्लीहून एका महिलेचा फोन आला. तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेत नोकरी लागणार असल्याचे सांगत त्या महिलेने पुढील कार्यवाहीसाठी दिव्या अहुजा नामक महिलेचा मोबाईल नंबर देऊन संपर्क करण्यास सांगितले. नोकरी लागण्याच्या शक्यतेने हुरळून गेलेल्या योगेशने त्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तिने २ हजार ८५० रुपये एका खात्यावर जमा करण्यास सांगितले.
योगेशने सदरील रक्कम जमा केल्यानंतर त्याची आॅनलाईन मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर त्याला नमिता गोयल नामक महिलेशी संपर्क करण्यास सांगण्यात आले. नमिताने सांगितल्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे शुल्क म्हणून योगेशने २० मार्च रोजी ७ हजार ५०० रुपये जमा केले. त्यानंतर नमिताने योगेशला ई-मेल द्वारे अपॉर्इंटमेंट लेटर देऊन संदीप शर्मा नामक व्यक्तीस संपर्क साधण्यास संगितले. संदीपने मुलाखतीत तुम्ही पास झाला असून प्रशिक्षणासाठी नोएडा येथे यावे लागेल. त्यासाठी प्रशिक्षण शुल्क २५ हजार ७०० रुपये आणि त्यावरील जीएसटी ७ हजार १९६ रुपये एका खात्यावर जमा करावेत अशी सूचना केली. योगेशने २७ मार्च आणि ६ एप्रिल अशा दोन टप्प्यात ही रक्कम जमा केली. त्यांनतर संदीपने पुन्हा त्याला लॅपटॉपसाठी ४५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले.
वारंवार वेगवेगळी रक्कम जमा करून घेतली जात असल्याने यावेळी मात्र योगेशला संशय आला. त्यामुळे त्याने लातूर येथील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत चौकशी केली असता अशी कोणतीही पोस्ट आमच्या बँकेत नसल्याचे सांगितल्याने फसवणूक झाल्याचे योगेशच्या लक्षात आले. याबाबत जाब विचारण्यासाठी त्याने वारंवार दिल्ली येथून आलेल्या सर्व क्रमांकावर फोन केला, परंतु कोणीही त्याचा फोन घेतला नाही.
अखेर योगेशने अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत फसवणूक झाल्याची तक्रार दिली. योगेशच्या फिर्यादीवरून दिव्या गोयल, नमिता गोयल, संदीप शर्मा आणि ७८३८५५८७२२ या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.