बीड: राज्यात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा वाहतूक शाखेच्या पुढाकाराने मंगळवारी सकाळी ११ वाजता जालना रोडवर वाहनचालकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर यांचे सहकार्य लाभले.
वाढते अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांची दृष्टी सदोष असणे गरजेचे असते, अनेक अपघातामध्ये वाहनचालकांच्या दृष्टिदोषामुळे दुर्घटना घडल्याचेही समोर आलेले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा वाहतूक शाखेने आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर यांच्या सहकार्याने वयाची ४० वर्षे पूर्ण केलेल्या चालकांची मोफत नेत्रतपासणी वाहतूक शाखेकडून करण्यात आली. यामध्ये जीप, बस, ऑटोरिक्षा ट्रक, टेम्पोसह इतर वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार, काही चालकांच्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक कैलास भारती, गौतम खटोड, संजय गीते, डॉ.विशाल पवार, उपनिरीक्षक गणेश झागडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक शाखाप्रमुख सपोनि कैलास भारती यांनी केले, इतर मान्यवरांनी भाषणे केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गंत विविध उपक्रम
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बीड वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते. त्या बैलगाडी किंवा वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होतात, हे अपघात टाळण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत, तसेच १० फेब्रुवारी रोजी गॅरेज संघटनेच्या सहकार्याने वाहनांची तपासणीही केली जाणार आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर शाळा-महाविद्यालयांत चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही सपोनि कैलास भारती यांनी दिली.