पत्रकार परिषदेत छाजेड म्हणाले, अहमदनगर येथील जैन सोशल फेडरेशनच्या वतीने विविध दानशूर व्यक्ती-संस्थांच्या मदतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलची स्थापना २८ मार्च २००१ रोजी झाली. आनंदऋषीजी नेत्रालयाची स्थापना १ नोव्हेंबर २०१७ मध्ये झाली. सेवाभाव केंद्रित ठेवून दोन्ही ठिकाणी ना नफा ना तोटा तत्त्वावर सर्व स्तरातील गरजू रुग्णांची सेवा केली जाते. ग्रामीण भागात व्हिजन सेंटरच्या माध्यमातून नेत्र शिबिरांचे आयोजन नेत्र शस्त्रक्रिया, काचबिंदू, रेटीना, बाल नेत्ररोग अशा सेवा दिल्या जात असल्याचे ते म्हणाले. समाजातील सर्व स्तरातील लोकांना उत्कृष्ट व दर्जेदार नेत्र सेवा पोहोचविण्यासाठी नेत्रालयाचे कामकाज सुरू असल्याचे छाजेड यांनी सांगितले.
अहमदनगर तसेच लगतच्या जिल्ह्याच्या आसपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी दर महिन्याला दोन मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. हृदयरोग,आर्थोपेडिक, नेफ्रोलॉजी, पिडियाट्रीक, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, युरोलॉजी, स्त्री रोग इ. आजारांवर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच ईसीएचएस, बीएसएनएल,महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील कॅशलेस सुविधा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
---------