माजलगाव : तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून माफियांनी वेगळी शक्कल लढवली असून चक्क केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करून पहाटेच्या सुमारास टिप्परमधून ती विकली जात आहे. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बजाज कॉम्प्लेक्ससमोर चक्क पहाटेच्या सुमारास टिप्परभर वाळू उतरविण्यात आली होती. दिवसभर तेथेच पडून होती हे विशेष. अशा वाळू वाहनांवर जिल्ह्यात दररोज कारवाई होताना माजलगावमध्येच पोलीस व महसूल खात्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्याच्या उत्तरेला गोदावरीचे विस्तीर्ण पात्र असून पावसाळ्यात सतत दोन महिने तुडुंब वाहत होते. त्यामुळे तेथे मोठा वाळूसाठा आहे. याचा फायदा उचलत अनेक भागांतून केनीच्या साहाय्याने वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. तालुक्यातील शेलगावथडी, गंगामसला, सादोळा , गोविंदपूर , चिंचोली , काळेगावथडी , पुरुषोत्तमपुरी, मोगरा, आबेगाव, बोरगाव येथे वाळूसाठा करण्याचा नवीन फंडा निवडला आहे. वाळू केनीच्या साहाय्याने उपसून काढायची, ती ट्रॅक्टरने बाहेर शेतात, परिसरात साठा करून मागणीप्रमाणे विकून टाकायची. या वाळूची रात्री दहापासून सकाळी सात वाजेपर्यंत वाहतूक करायची व लोकांना ४०-५० हजारांत टिप्पर विक्री होत आहे. शहरात लहान व मोठी बांधकामे सुरू असून तेथे पहाटे वाळू टाकण्यात येते. मात्र, पोलीस ठाणे ऐन रस्त्यावर व मध्यवर्ती भागात असताना वाळू वाहतूक व चोरीकडे डोळेझाक केली जात आहे.
तालुक्यात गोदावरी नदीकाठी वाळू उपसता येतील अशी जवळपास २३ गावे आहेत. दरवर्षी यातील काही ठिकाणीच वाळूबाबत निविदा काढण्यात येतात. यंदा तालुक्यातील ४ गावांतील वाळूघाटांच्या लिलावासाठीचा प्रस्ताव पर्यावरण खात्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यास लवकर मंजुरी मिळाली तर निविदा निघून चोरी थांबण्याची शक्यता आहे. मात्र, वर्ष उलटले तरी निविदा नसल्याने त्याचा फायदा माफिया घेत आहेत. त्यांना विनानिविदा कुठलीही झंझट न करता वाळूउपसा करता येते. तर दुसरीकडे मात्र शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत येथील तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, आम्ही कर्मचाऱ्यांमार्फत कारवाया करू, मात्र शहरात एकाही वाळूमाफियावर कारवाई झालेली नाही, हे विशेष.