बीड : बदली प्रक्रिया म्हटली की, वशिला लावून ‘टेंडर’ (लाखो रुपये लाच) भरण्याची प्रथा होती; परंतु आता ती मोडीत निघाली असून, आरोग्य विभागाने बदल्यांसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात अर्ज भरून मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १३ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, १७ मे शेवटची तारीख आहे. या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांसाठी ‘गम’ तर नवख्यांमध्ये ‘खुशी’ आहे. यावेळी पहिल्यांदाच शासनाने डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना एका संस्थेत ३ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांनी ऑनलाइन ट्रान्स्फर ॲपवर अर्ज करून पोस्टिंग निवडायची आहे. यामुळे डॉक्टरांचा होणारा ‘अधिकचा खर्च’ वाचणार आहे.
ज्यांची सेवा जास्त, त्याला प्राधान्यआलेल्या अर्जांमधून सेवाज्येष्ठता यादी तयारी केली जाईल. त्यानंतर ती प्रकाशित करून आक्षेप मागिवले जातील. ते पूर्ण झाल्यावर ज्यांची सेवा जास्त त्यांना आगोदर प्राधान्य देऊन पोस्टिंग दिली जाणार आहे.
रिक्त पदांची यादी ज्या संस्थेत, जिल्ह्यात पदे रिक्त आहेत किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी झालेल्या पदांची यादी शासनाने जाहीर केली आहे. ते पाहूनच अर्ज भरायचा आहे. एका डॉक्टरला १० ठिकाणे निवडता येतील.
मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्या होत असल्याने आम्ही समाधानी आहोत. शासन निर्णय व बदलीचे सर्व नियम नजरेसमोर ठेवूनच बदल्या केल्या जाणार असल्याने पारदर्शकता राहील. -डॉ. आर.बी. पवार, राज्याध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना