बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू आहे. जिल्हा रूग्णालया पाठोपाठ आता मलेरिया विभागातील त्या सहा कर्मचाऱ्यांवरही बडतर्फची कारवाई करण्यात आल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून कारवाई रखडल्याचे समोर आणले होते. याबाबत ‘मलेरिया विभागातील त्या सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार’ या मथळ्याखाली वृत्तही प्रकाशित केले होते.
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसतानाही खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आले होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानंतर हे कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने ही बाब गंभीर असून अधिकाऱ्यांनीच आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा रूग्णालयाच्या अस्थापनेवरील वर्ग ३ च्या ३ कर्मचाऱ्यांवर लातुरच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक माले यांनी आणि वर्ग ४ चे १७ कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
आता जिल्हा रूग्णालया पाठोपाठ मलेरिया विभागातीलही सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. एस.एम साखरे, एस.यु. बांगर. एम. पी. नांगरे, बी.बी. राख, एस.आर.वनवे, जी.एस. वनवे अशी बडतर्फ झालेल्या सहा कर्मचाऱ्यांची नावे आहेत.