अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड होत आहेत. वीज पुरवठा अनियमित व अचानकच कमी जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले रोहित्र आठ ते दहा दिवस बदलून मिळत नाहीत. याचा मोठा फटका सिंचनाला बसतो. पिके जोमात आलेली आहेत. त्यांना पाण्याची आवश्यकता असताना रोहित्रात होणारे बिघाड शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागले आहेत.
पाझर तलाव खोलीकरणाची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शासनाने तलावाचे खोलीकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप आडसूळ यांनी केली आहे.
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला खो
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रासपणे सुरूच आहे. शासनाने बंदी घातल्यानंतर प्लास्टिकच्या वापराला आळा बसणे आवश्यक आहे. पर्यावरणाला घातक ठरणारे प्लास्टिक वापरांमुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे. व पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी प्लास्टिक बंदीचे गांभीर्य नागरिकांनी बाळगावे .
पाटबंधारे विभागात अनेक पदे रिक्त
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात पाटबंधारे विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्याने जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण वाढला आहे. परिणामी कामे वेळेवर होत नाहीत. पाटबंधारे विभागात रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत व हा विभाग सक्रिय करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
सुधारित वेतनाची प्रतीक्षा
अंबाजोगाई - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हे सुधारित वेतन लागू करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.
घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित
अंबाजोगाई : दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लाभार्थींना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या वतीने विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील मुडेगाव, राडी, दैठणा, आपेगाव, राडीतांडा, तडोळा या परिसरातील अनेक लाभार्थींना अजूनही अनुदान मिळाले नाही. या परिसरातील लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.
शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची मोठी संख्या आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. या शिवाय बँकेत कोरोना विषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.