सोमनाथ खताळ, बीड : दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. दारू लयी बेक्कार असल्याचे सांगितले जात असले तरी काही तरुण त्याच्या आहारी जात आहेत. याच दारूच्या व्यसनापायी पाच मित्र दुचाकीचोर बनले आहेत. याच चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सद्दाम मुसा शेख (रा. बागवान गल्ली, केज), अमोल रामचंद्र कुरूंद (रा. वानगाव फाटा), ख्वाजामिया नवाब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज), अशोक फुलचंद शिंदे व किरण अरुण पिसुरे (दोघे रा. जानेगाव, ता. केज) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व मित्र आहेत. ते दारू पिण्याच्या सवयीचे आहेत. काम न करता पैसे हवे असल्याने त्यांनी दुचाकीचोरीचा निर्णय घेतला. मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकींवर चोरट्यांची नजर होती. हँडल लॉक तोडून ते दुचाकी पळवत असत. मागील चार महिन्यांपासून त्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने आपल्याकडे घेतला. त्यानंतर सद्दामबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी त्याला विश्वासात घेतल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. मग एलसीबीने त्याच्या चारही साथीदारांना केजमधून बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडून १२ दुचाकीही जप्त केल्या. त्यांना बीड शहर पाेलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, नसीर शेख, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भागवत शेलार, देविदास जमदाडे, बप्पासाहेब घोडके, विकी सुरवसे, गणेश मराडे, उगले आदींनी केली.
नवख्या गुन्हेगारांना शोधण्यात कसरत
दुचाकीचोरांची ही टोळी नवीन आहे. पहिल्यांदाच हे पाचही चोरटे रेकॉर्डवर आले आहेत. पोलिसांनी अगोदर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला, परंतु काहीच हाती लागले नाही. या नवख्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी पथकाला परिश्रम घ्यावे लागले. परंतु कानून के हाथ लंबे होते है, या उक्तीप्रमाणे पोलिसांनी या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या.