लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
शहरातील संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान येथून शिवाजीनगर रस्त्याने हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष कमल बांगर, जिल्हा संघटक सचिन आंधळे यांनी केले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या अद्याप प्रलंबित आहेत. अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधन वाढीचा शासन निर्णय लवकर जारी करावा, इंधन व प्रवास बिल मिळावे, निकृष्ट प्रतीचा टीएचआर देण्याऐवजी लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करावी, भाऊबीज भेट मिळावी इ. मागण्यांचा समावेश आहे.
हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांना देण्यात आले. यावेळी पदाधिका-यांसह राज्य संघटक दत्ता देशमुख, रजिया दारूवाले, कौशल्या कट्यारे, गयाबाई सोळंके, मंगल थोरात, लता बोबडे, सत्यभामा सुपेकर, संजीवनी डोंगर, लता चेपटे, वत्सला नाईकवाडे, श्यामल जोगदंड, शीला उजगरे, मंगल गुजर, शर्मिला ठोंबरे, निर्मला कराड, मीना कांडेकर यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.