परळी : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं...नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणतो...मेगा भरती रद्द झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन चालूच होते. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार शरद झाडके यांनी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. शहरातील शिवाजी चौकात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ठोक मोर्चासाठी मराठा समाजातील युवक जमण्यास सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजता शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व अभिवादन करून मोर्चास सुरूवात झाली.मराठाला समाजाला आरक्षण द्यावे, शेतकºयांना कर्जमाफी करावी, धान्याला हमीभाव द्यावा, शासनाची मेगा भरती रद्द करावी या मागण्यांसह एक मराठा लाख मराठा, जय भवानी-जय जिजाऊ, जय जिजाऊ-जय शिवराय अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. हा मोर्चा आझाद चौक, वैद्यनाथ महाविद्यालय रोड मार्ग परळी तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चेक-यांसमोर बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पुणे येथील आबासाहेब पाटील म्हणाले, मराठा समाज बांधवांची एकजूट हवी आहे. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा या मागणीसाठी राज्यभर समाजबांधवांनी आतापर्यंत ५७ मोर्चे काढले. मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा इशारा देत वज्रमूठ आवळण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयीन प्रवेश शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद पाडावे, आम्हाला नाही तर कोणाला नाही असा आक्रमक पवित्रा घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी तरुणांना दिला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आता मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात पूजा करू देणार नाही असा निर्णयच मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केला आहे. पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आबासाहेब पाटील यांनी केले. परळीच्या माजी नगरसेविका अन्नपूर्णा जाधव यांनी शासनाला मराठा आरक्षणाचा निर्णय घेता न आल्याने बांगड्या भरण्यासाठी स्वंयसेवकाकडे बांगड्या देण्यात येत असल्याचे सांगितले.
याबरोबरच महेश डोंगरे, संजय सावंत, स्वाती नखाते, नानासाहेब जावळे, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, पुजा सोळंके, अमीत घाडगे यांनीही आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री व शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मोर्चेक-यांसाठी वाहेद खान पठाण, उपगराध्यक्ष अय्युब पठाण व मित्र परिवाराने पिण्याच्या पाण्याची सोय केली. मोर्चातील घोषणांनी शहर दणाणले होते. तुळजापूरनंतर परळीत काढण्यात आलेल्या या ठोक मोर्चाचे मागील दोन आठवड्यापासून नियोजन करण्यात आले होते. शिस्तबद्धपणे निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.
मोर्चेक-यांचे ठिय्या आंदोलनजोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा परळीतील मोर्चेकºयांनी दुपारच्या सुमारास केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत.उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरी आपली जागा सोडणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली होती. रात्री ९ वाजेपर्यंत पेच कायम होता.
चोख पोलीस बंदोबस्तशहरात ठिकठिकाणी पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक ६, पोलीस निरीक्षक २०, पोलीस उपनिरीक्षक ९०, पोलीस कर्मचारी ८००, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या (२०० कर्मचारी), आरसीपी प्लाटून ३ (७५ कर्मचारी) तैनात होते.