रस्ता प्रश्न मार्गी लावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. यामुळे रस्ता वाहतुकीस अरुंद होत आहे.
रात्रीची गस्त सुरू करा
घाटनांदूर : अंबाजोगाई व परळी तालुक्यातील ग्रामीण भागात लहान- मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी जेणेकरून या चोरट्यांना आवर घालता येईल, यामुळे अशी मागणी अनेक भागातील नागरिकांमधून केली जात आहे.