पिकांवर किडीसाठी मार्गदर्शनाची गरज
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने यासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी अरविंद जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त
माजलगाव : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र पाईप लाईन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पर्यावरणास धोका; कारवाईची मागणी
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूरच्या नदीतून अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा सुरूच आहे.
बाजारात फळांची विक्री वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या बाजारपेठेत केळी, मोसंबी,पेरू,सफरचंद, डाळिंब,अंजीर या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात दररोज आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सी विटॅमिनच्या फळांना मागणी असून परवडणारे दर असल्याने ग्राहकही फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
वाहने हटवावीत
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी कधी वादाचे देखील प्रसंग उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
रात्रीची गस्त सुरू करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात लहान मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अनेक वसाहतीत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी अनेक भागातील नागरिकांमधून अनेक दिवसांपासून केली जात आहे.
नाल्या तुंबल्याने त्रास
बीड : शहरातील शाहूनगर परिसरात नाल्या तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर खड्डे पडलेले असून, याच खड्ड्यात हे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती देखील वाढत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
खड्ड्यांतून वाहतूक
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्येमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.