माजलगाव : शहरात एक ते सव्वा वाजेच्या आत शहरातील ९० टक्के दुकाने आपोआपच बंद होतात; परंतु आंबेडकर चौक व शिवाजी चौकात असलेली फळांची दुकाने मात्र कितीही वेळ सुरू असतात. पोलीस येताच ते पडदा खाली करतात, तर पोलीस जाताच पडदा वर करतात. पोलिसांनाही हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून जनतेचे आरोग्य धोक्यात घातले जात आहे.
या फळविक्रेते व पोलिसांच्या खेळात मात्र गर्दी जमत असून, कोरोनाचा फैलाव होण्यास मदत होत आहे.
बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला. व्यावसायिकांना या ठिकाणी देण्यात आलेल्या वेळेत मोंढ्यातील व मुख्य रस्त्यावरील ९० टक्के दुकाने बंद होतात. या व्यापाऱ्यांना न सांगता ते दुकाने बंद करतात व घरी निघून जातात. मात्र, आंबेडकर चौक व शिवाजी चौकात असलेले फळविक्रेते मात्र कितीही वेळ आपली दुकाने उघडी ठेवतात. पोलिसांची गाडी आली की, हे फळविक्रेते आपल्या दुकानाचे पडदे खाली घेतात. काही दुकाने उघडी असताना पोलीस दुकानासमोर आले असता ते दुकानाच्या पाठीमागे जाऊन लपून बसतात.
पोलीस पाच मिनिटे उभे राहून परत जाताच फळविक्रेते दुकानाचे पडदे वर घेतात. असा खेळ अडीच-तीन वाजेपर्यंत चालतो. या फळविक्रेत्यांच्या तोंडाही मास्क नसतो. गर्दीमुळे शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत.
पोलिसांचा नाही राहिला वचक
शहरात लाॅकडाऊन सुरू असताना नागरिक रस्त्यावर बिनधास्त फिरत असताना पोलिसांकडून कोणावरही कारवाई होताना दिसत नाही किंवा एखाद्याला पकडून आणून त्याला समन्स देऊन सोडल्याचे ऐकण्यात नाही. शहरात लाॅकडाऊनमध्येही सर्व अवैध धंदे सुरू आहेत. यामुळे मागील पाच-सहा महिन्यांत शहर पोलिसांचा वचक राहिलेला दिसून येत नाही.
===Photopath===
020421\img_20210402_132114_14.jpg