अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीच्या मशागतीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी शेतीच्या मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील शेती ही सध्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातून मांजरा धरणाचा डावा कालवा लातूरकडे जातो. या कालव्यावर मोठ्या प्रमाणात सिंचन होते. त्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर तालुक्यात सर्वच ठिकाणी रब्बी व खरीप हंगामाची मदार ही यंत्राच्या साहाय्याने केली जाते. नांगरणी, पेरणी, कोळपणी, रोटर, अशी विविध कामे प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात. मशागतीचे प्रमुख साधन ट्रॅक्टर बनले आहे. मात्र, दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढत असल्याने आता ट्रॅक्टर यंत्राने शेती करणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीतील मशागतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती शेतीची झाली आहे.
पूर्वी शेतकरी मशागत बैलाच्या साह्याने करत असत. त्यामुळे शेतातील नांगरटी, मोगडा, कोळपणी, कुळव या माध्यमातून कामे होत असल्याने खर्चही कमी होता. मात्र आता बैलजोडीचे भाव वाढल्याने व जनावरे सांभाळणे हे काम मोठ्या जिकिरीचे झाल्याने शेतातून बैलजोडी हद्दपार झाली आहे. बैल बारदाना मोडीत निघाल्याने शेतीची पूर्ण मदार ट्रॅक्टरवर अवलंबून आहे. आता शेती मशागतीचे दर ट्रॅक्टर चालकांनी वाढवले आहेत.
बैलजोडी परवडत नाही
इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीची मशागत आता परवडणारी नसली तरी काळानुरूप बैलजोड्या ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. इंधनाचे भाव कमी झाले तर शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बैलजोडीची किंमत लाखांच्या पुढे गेली आहे व बैलबारदाना सांभाळणे मोठ्या महागाचे व जिकिरीचे काम आहे. त्यामुळे बैलजोडी परवडत नाही. - रवींद्र देवरवाडे, (प्रगतिशील शेतकरी).
कमी वेळेत मशागत
शेतीची कामे लवकर व्हावीत यासाठी ट्रॅक्टरला विविध प्रकारची यंत्रे जोडून मशागत केली जाते. दोनच दिवसांत तातडीने मशागतीची कामे केली जातात. शेतकऱ्यांनी बैलबारदाना मोडीत काढल्याने आता ट्रॅक्टर हेच त्यांचे मशागतीचे प्रमुख साधन झाले आहे. इंधनाचे दर वाढत चालल्याने मशागतीचे दर वाढत आहेत.
- नारायण शेप, ट्रॅक्टर चालक